Friday, June 6, 2025

सौरऊर्जेवरील उपसा सिंचन योजना शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास

नागपूर- शेतकऱ्यांसाठी पाणी हा कळीचा मुद्दा आहे. त्यांना नियमीत पाणी मिळाले तर केवळ शेतीचाच प्रश्न सुटणार नाही, तर गावातील एकूणच समस्या मार्गी लागतील. मुरादपूर उपसा सिंचन योजना आजपासून लोकांच्या सेवेत अर्पण करण्यात आली आहे. सौरऊर्जेवरील ही उपसा सिंचन योजना या भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.उमरेड तालुक्यातील वडगाव जलाशयावर (वेणा नदीवरील) सौर ऊर्जेवर संचालित मुरादपूर उपसा सिंचन योजनेचे ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार संजय मेश्राम, माजी आमदार सुधीर पारवे, सरपंच दुर्गा आलाम, उपसरपंच गजानन गाडगे, आदिवासी विभागाचे उपसंचालक श्री. चव्हाण, मानस उद्योग समूहाचे उपाध्यक्ष जयकुमार वर्मा, उपाध्यक्ष आनंदराव राऊत आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.ना. श्री. गडकरी म्हणाले
'बऱ्याच दिवसांपासून या भागात अश्या प्रकल्पासाठी आम्ही प्रयत्नरत होतो. या विभागातील निवृत्त मुख्य अभियंता श्री. जनबंधू या प्रकल्पाचा प्रस्ताव घेऊन माझ्याकडे आले. त्यानंतर याचे काम सुरू झाले. सौरऊर्जेमुळे जे पाणी शेतीसाठी उपलब्ध होणार आहे, त्यातून शेतकऱ्यांना दोन ते तीन पिके घेता येणार आहेत. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे.या भागात ५३ टक्के आदिवासी लोक राहतात. हा परिसर सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागास आहे. त्यामुळे या समाजासह येथील एकूणच सर्वसामान्य लोकांचे जगणे सुसह्य करणे गरजेचे आहे. 
त्यादृष्टीने पं. दिनदयाल उपाध्याय यांनी दिलेला अंत्योदयचा संदेश घेऊन आम्ही काम करतोय. समाजातील उपेक्षित वर्गाला परमेश्वर मानून त्याची निरंतर सेवा केली पाहिजे, हे त्यांचे सामाजिक-आर्थिक चिंतन आम्ही जोपासले आहे, याचाही ना. श्री. गडकरी यांनी उल्लेख केला.या पाण्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट होणार आहे. ऊस, मका, धानासारखे नगदी पिक लावून नफा मिळविण्यासाठी जनकल्याण समितीने लक्ष घालण्याची गरज आहे. शेतकऱ्याला उत्तम भाव मिळाला पाहिजे. त्याच्या उत्पादनांची गुणवत्ता चांगली असायला पाहिजे. त्यातून त्याचा विकास साधता आला पाहिजे, हाच यामागचा उद्देश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.शेतकऱ्यांना पाणी मिळाले आहे, आता फार्मर प्रोड्युस कंपनी तयार करावी, असे आवाहन ना. श्री. गडकरी यांनी केले. एक ट्रॅक्टर घेऊन संपूर्ण गावातील वखरणी एकाच ट्रॅक्टरने करा.

द्रोणने स्प्रेयींग करा. यातून एकरी पाच ते सहा हजार रुपयांची बचत होईल. तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती केली तर उत्पादन वाढेल आणि नफाही वाढेल, असेही ते म्हणाले.शंभर कोटी रुपयांमध्ये दहा एकर जागेवर स्मार्ट व्हिलेज बांधायला घेतले आहे. लवकरच या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. ४०० लोकांनी घरांसाठी नोंदणीही केली आहे. यात एक हजार लोकांना घरे देणार आहोत. ४५० चौरस फुटाचे घर, सिमेंटचे रस्ते, आयुष्यभर पाणी आणि वीज मोफत देण्याचा प्रयत्न आहे. याठिकाणी खेळाचे मैदान आणि उद्यानही असेल, अशी माहिती ना. श्री. गडकरी यांनी दिली.रामा डॅमच्या जलाशयात तरंगते सोलर पॅनल्स,प्रत्येकाच्या क्षेत्रात ठिबक सिंचनाची सोय,एका कंट्रोल रूममधून संपूर्ण क्षेत्रात पाणीवाटप,संपूर्ण प्रकल्पावर पाणीवापर संस्थेचे नियंत्रण,सोलर पॅनलद्वारे वीज निर्मिती होईल व ते एमएसईबीला जोडले जाणार असल्यामुळे योजनेवरील वीज बिलाचा भार कमी राहणार,मुरादपूर प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याचा उपसा करून शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाद्वारे शेतीकरिता पाणी वापरता येणार आहे.या प्रकल्पात वडगाव धरणाचे पाणी जॅकवेलमधून पंपाद्वारे उचलून एम.एस. पाईपलाईन द्वारे डिलीव्हरी चेंबर -1 ला पोहोचवले जाणार आहे. त्यानंतर डिलीव्हरी चेंबर क्र.-1 ते डिलीव्हरी चेंबर क्र.-2 ला गुरुत्वाकर्षणाद्वारे पाणी पोहोचवले जाईल.डिलीव्हरी चेंबर क्र.-1 व डिलीव्हरी चेंबर क्र.-2 ला पाणी पोहोचल्यानंतर डिलीव्हरी चेंबर क्र.1 व क्र. 2 वर बसविण्यात आलेल्या 20 एच.पी.च्या पंपाद्वारे शेतीला ठिबक सिंचन करण्यात येईल. यामुळे 465 एकर शेतजमीनीला बारमाही पाणी उपलब्ध होईल.गावातील 465 एकर शेतजमिनीसाठी बारमाही पाणी वडगाव जलाशयातून उचल करता येणार आहे. या प्रकल्पात 270 केव्हीए क्षमतेचे तरंगते सौर ऊर्जा पॅनल्स आहेत. या सौर पॅनलमुळे जवळपास प्रतिदिन 1080 युनिट उर्जा निर्माण होणार आहे. निर्माण झालेल्या उर्जेमुळे प्रकल्पावरील सर्व पंप व विजेवरील सर्व उपकरणे विनाशुल्क चालविण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...