Monday, December 9, 2024

सार्वजनिक शौचालय सुस्थितीत नसल्यास होणार कारवाई अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांचा इशारा

नागपूर :- नागपूर शहरातील सार्वजनिक शौचालयांची योग्य प्रकारे देखभाल न केल्यास व शौचालय सुस्थितीत नसल्यास सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशारा नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी दिला आहे. ज्या शौचालयांची स्थिती वाईट आहे त्यांनी पुढील दहा दिवसांत शौचालयांची दुरुस्ती आणि देखभाल योग्य रितीने न केल्यास संबंधित संस्थेला कारणे दाखवा नोटीस देऊन सक्त कारवाई करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. शहरातील बाजारपेठा आणि इतर ठिकाणी असलेल्या सार्वजनिक शौचालयांच्या देखभाल व दुरुस्तीच्या संदर्भात अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीत कार्यकारी अभियंता (स्लम) श्री. कमलेश चौहान, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, उपअभियंता श्रीमती वैजंती आडे, कनिष्ठ अभियंता श्री. सचिन चमाटे, श्री. देवेन्द्र भोवते आणि इतर अधिकारी उपस्थित होते. नागपूर शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या व्यवस्थापनासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे वेगवेगळ्या संस्थांना कंत्राट देण्यात आले आहेत. त्यानुसार सुलभ 
इंटरनॅशनल संस्थेद्वारे ५२ शौचालय, मेहतर समाज सर्वांगीण विकास संस्थेद्वारे ६, आदर्श ग्राम विकास संस्थेद्वारे ७ तसेच ७८६ कॉन्स्ट्रक्शनद्वारे १ शौचालयाचे व्यवस्थापन केले जात आहे. या संस्थांच्या माध्यमातून एकूण ६६ शौचालयांमध्ये पुरुषांसाठी २६७, महिलांसाठी १६३ आणि दिव्यांगांसाठी ६२ शौचालये उपलब्ध करण्यात आली आहेत. याशिवाय ११० स्नानगृहे आणि २९७ मुत्रालये सुद्धा कार्यान्वित आहेत. सद्यस्थितीत ६१ शौचालये सुरू आहेत.अतिरिक्त आयुक्त श्रीमती गोयल यांनी सार्वजनिक शौचालयांमध्ये पसरलेली घाण, दुर्गंधी, अस्वच्छता आणि कर्मचाऱ्यांचे गणवेश नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, शौचालयांमध्ये पाणी व विद्युत पुरवठा नसतो तसेच कर्मचारी नागरिकांशी योग्य प्रकारे वागणूक ठेवत नाहीत. त्यांनी कंत्राटदारांना त्यांच्या शौचालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी, त्यांचे गणवेश आणि त्यांच्या प्रशिक्षणासाठी कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले. तसेच करारनाम्यानुसार देखभाल व दुरुस्तीमध्ये दिरंगाई झाल्यास त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आणि पुढील १० दिवसांत सुधारणा न झाल्यास कंत्राट रद्द करण्याचे निर्देशही दिले आहेत.

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...