नागपूर:- नागपूर
शहरातील सिवर लाईन तसेच गडर लाईनच्या स्वच्छतेसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे शंभर
टक्के यांत्रिकी पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. गडर लाईन चोकेजच्या प्राप्त
तक्रारींवर निराकरणासाठी मनपाद्वारे मनुष्यबळाचा वापर पूर्णत: बंद करण्यात आलेला
आहे. त्याऐवजी सक्शन कम जेटिंग मशीनद्वारे स्वच्छता करण्यात येत आहे.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या
निर्देशानुसार मनुष्यबळाच्या वापराद्वारे गडर लाईन स्वच्छता न करण्याच्या
कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे. नागपूर
शहरातील मोठ्या प्रशस्त वस्त्यांसोबत छोट्या दाटीवाटीच्या वस्त्यांमध्येही
यांत्रिकी पद्धतीद्वारेच सिवर लाईन स्वच्छतेचे कार्य केले जाते. यासाठी नागपूर
महानगरपालिकेकडे स्वत:च्या मालकीच्या ११ सक्शन कम जेटिंग मशीन आहेत. याशिवाय
भाडेतत्वावर ६ मोठ्या आणि ५ लहान अशा ११ मशीन देखील सेवेत दाखल आहेत. मोठे रस्ते
तसेच मुबलक
जागा असलेल्या ठिकाणी मोठ्या मशीनद्वारे आणि निमुळते रस्ते तसेच दाटीवाटीच्या
वस्त्यांमधील स्वच्छतेसाठी छोट्या मशीनचा वापर करण्यात येतो. या मशीनद्वारे नागपूर
महानगरपालिकेसोबतच नागपूर सुधार प्रन्यास आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेद्वारे
विकसीत भागातही सेवा दिली जाते. नागपूर सुधार प्रन्यास आणि सार्वजनिक बांधकाम
विभागाद्वारे विकसीत बहुतांश भागांमध्ये सेप्टिक टँकची संख्या जास्त आहे. अशा
ठिकाणी नागपूर महानगरपालिकेच्या सक्शन कम जेटिंग मशीनद्वारे स्वच्छता केली जाते.
ऑक्टोबर २०२४ पासून ७ फेब्रुवारीपर्यंत मनपाकडे सिवर लाईन चोकेजच्या एकूण ८९५७२
तक्रारी प्राप्त झाल्या
असून यापैकी ८८६१३ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
९५१ तक्रारींवर सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागामार्फत सिवर लाईन चोकेज
दुरुस्ती तसेच नवीन लाईन टाकण्याचे काम सुरु आहे, अशी
माहिती उपायुक्त श्री. विजय देशमुख यांनी दिली आहे.शहरात अनेक ठिकाणच्या सिवर लाईन
अत्यंत जुन्या झालेल्या आहेत. त्यामुळे अशा भागांमध्ये सिवर लाईन चोकेजच्या
तक्रारी वाढत आहेत. अशा ठिकाणी जलद गतीने सेवा देण्यात यावी याकरिता ५ सक्शन
कम जेटिंग मशीनचा लवकरच सेवेमध्ये समावेश करण्याबाबत मनपा प्रयत्नशील आहे, असेही श्री. देशमुख यांनी
सांगितले. जुन्या आणि जीर्ण झालेल्या सिवर लाईनची क्षमता कमी असल्यामुळे
नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अशा स्थितीत अमृत योजनेंतर्गत जुन्या लाईन
बदलण्याचा महत्वाचा निर्णय नागपूर महानगरपालिकेद्वारे घेण्यात आला आहे. भविष्यातील
सुविधेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. नवीन लाईनमुळे सिवेज क्षमता
वाढेल व यासंदर्भातील तक्रारी देखील कमी होतील, असा
विश्वासही श्री. विजय देशमुख यांनी
व्यक्त केला.नागपूर सुधार प्रन्यासद्वारे ज्या भागांमध्ये जुन्या सिवर लाईन
टाकण्यात आलेल्या आहेत. त्या भागातील लाईन बदलून नवीन लाईन टाकण्याबाबत प्रन्यास
सोबत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.
No comments:
Post a Comment