नागपूर:-मा.उच्च
न्यायालयाच्या निर्देशानुसार महाल परिसरात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकाम
तोडण्याच्या कामाचे गुरूवारी (ता.२५) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी
यांनी निरीक्षण केले. यावेळी आयुक्तांनी नागरिकांशी संवाद साधला. संबंधित कारवाई
मा. उच्च न्यायलयाच्या निर्देशानुसार लवकरात लवकर पूर्ण करण्याचे त्यांनी
कंत्राटदाराला निर्देश दिले. तसेच अतिरिक्त कामगार या कामासाठी लावण्याचे व
स्थापत्य अभियंता यांना या
कार्यवाहीचे दररोज निरीक्षण करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.गांधीबाग
झोनचे सहायक आयुक्त श्री गणेश राठोड, नगर
रचना विभाग उपसंचालक प्रमोद गावंडे, अतिक्रमण
विभागाचे सहायक आयुक्त श्री. हरीश राऊत, विधी
अधिकारी श्री प्रकाश बरडे, कार्यकारी
अभियंता श्री.मंगेश गेडाम आदी याप्रसंगी उपस्थित होते.महाल
परिसरातील कल्याणेश्वर
मंदिराजवळील 'गायत्री प्लाझा' या इमारतीत बांधण्यात आलेले अवैध फ्लॅट्सवर मनपाच्या अतिक्रमण विरोधी
पथकाद्वारे कारवाई करण्यात आली असून येथील अनधिकृत बांधकाम पाडण्यात येत आहे.
याबरोबरच या इमारतीत मंजुरी न घेता बांधण्यात आलेल्या इतर बांधकामांवरही कारवाई
करण्यात येत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू आहे.महाल येथे
अहीरराव वाडा या जागेत गायत्री प्लाझाचे बांधकाम करण्यासाठी १९९२ मध्ये नगररचना
विभागाकडून नकाशासाठी मंजुरी घेण्यात आली होती.
मात्र संबंधित विकासकाने परवानगीपेक्षा अधिक बांधकाम करून
येथील सुमारे ३२ फ्लॅट वेगवेगळ्या लोकांना विकले. येथील अवैध बांधकामाचा मुद्दा
घेऊन २०१७ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. २५ सप्टेंबर २०१९
मध्ये न्यायालयाने अवैध बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर १५ एप्रिल
२०२४ रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्याचे निर्देश मनपा आयुक्त
तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाला दिले. त्यानुसार तात्काळ कारवाई
करीत संबंधित इमारतीतील अवैध बांधकाम पाडण्यास सुरूवात झाली.
No comments:
Post a Comment