नागपूर:- येत्या
७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. गणेशोत्सवात पीओपी मूर्तींची
स्थापना होऊ नये यासाठी आता मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने
निर्देश दिले आहेत. मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिका आणि
पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक गुरूवारी 29 ऑगस्ट रोजी घेण्यात आली. पोलीस
आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांचे अध्यक्षतेखाली पोलीस मुख्यालयात आयोजित
बैठकीत मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, घनकचरा
व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले उपस्थित होते. बैठकीत सार्वजनिक
गणेशोत्सव मंडळांद्वारे स्थापना करण्यात येणारी श्रीगणेशाची मूर्ती पूर्णत:
मातीचीच आहे, याची
खात्री देण्यासाठी श्री गणेशोत्सव मंडळांना हमीपत्र 100 रू. स्टॅम्प पेपरवर सादर
करणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना
मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे तसेच पीओपी मूर्तीवर
कार्यवाहीच्या संदर्भात महानगरपालिकेला संपूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले.
मा. उच्च न्यायालयाच्या
निर्देशाचे संपूर्ण शहरात काटेकोर पालन व्हावे, यादृष्टीने
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाला सूचित केले आहे.
हमीपत्र देऊनही नियम व अटी शर्तींचे गणेशोत्सव मंडळांकडून भंग करण्यात आल्यास
त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिका
प्रशासनाद्वारे प्लॉस्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपीच्या मूर्तींवर पूर्णत: बंदी
आणण्यात आली आहे. शहरात कुठेही पीओपी मूर्तीची निर्मिती, विक्री
अथवा साठवणूक होउ नये यादृष्टीने दिशानिर्देश देखील जारी करण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्ती
स्थापन करण्यास बंदी घातली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सार्वजनिक गणेश
मंडळांना हमी द्यावी लागेल की, ते फक्त पर्यावरणपूरक (मातीची) श्रींच्या मूर्तीची
स्थापना करतील व कोणत्याही परिस्थितीत पीओपी पासून निर्मिती मूर्ती
स्थापीत करणार नाही.
मंडळातर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडाळातर्फे जारी
केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना दिनांक १२ मे २०२० व त्या अनुंषगाने महाराष्ट्र
शासनाने पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे २६ एप्रिल २०२४ रोजी निर्गमीत
केलेल्या दिशानिर्देशांचे काटेकोरपणे अनुपालन करणार व त्यात कोणत्याही प्रकारचे
हयगय करणार नाही. मंडळामार्फत पीओपी मूर्ती स्थापित केल्याची बाब प्राधिकरणाच्या
निदर्शनास आल्यास मंडळाला देण्यात आलेली परवानगी त्वरीत प्रभावाने रद्द करण्यात
येईल. मंडाळाला काळ्या यादीत टाकण्यात येउन पुढील वर्षी मंडाळाला परवानगी देण्यात येणार
नाही
तसेच मंडाळाचे आम्ही सर्व पदाधिकारी व सदस्य्ा फौजदारी कार्यवाहीस पात्र
राहू व त्यास आमची कोणतीही हरकत राहणार नाही, अशी हमी गणेशोत्सव मंडळांना देणे
अनिवार्य आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास फौजदारी कार्यवाही करण्याचे निर्देश पोलीस
आयुक्त डॉ. सिंघल यांनी दिले.पीओपी ला नाही म्हणा, मातीपासून बनलेल्या श्रीगणेशाचीच
स्थापना करा : आयुक्त श्रीगणेशोत्सव आणि आनंद आणि
चैतन्याचा सण आहे. या सणातून इतरांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हावा, हाच
हेतू आहे. पीओपी अर्थात प्लॉस्टर ऑफ पॅरीस हे पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे.
यामुळे मानवासोबतच निसर्गातील इतर घटकांनाही हानी पोहोचू शकते. त्यामुळे हा
गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी पुढाकार घ्या. आपल्या घरी, आपल्या
मंडळाद्वारे स्थापन करण्यात येणारी श्रीगणेशाची मूर्ती मातीचीच असल्याची खात्री
करूनच खरेदी करा. यासोबतच श्रीगणेशाची आरास करताना सजावटीमध्ये प्लॉस्टिक, थर्मोकॉल
आणि इतर कृत्रिम साहित्यांचा वापर करू नका, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक
डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.