Saturday, August 17, 2024

कला-संस्कृतीमधून होतात व्यक्तित्वावर संस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर:- कला-संस्कृती आणि खेळांमधून मुलांच्या व्यक्तित्वावर संस्कार होत असतात. मुलांच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याच्या उद्देशाने बाल कला अकादमी आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाने सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले. बाल कला अकादमी आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खासदार चषक आंतरशालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचा समारोप झाला. रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला ना. श्री. गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ वक्ते-प्रवचनकार विवेक घळसासी, स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे रवींद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष माधुरी सावरकर, बाल कला अकादमीच्या अध्यक्ष मधुरा रोडी गडकरी, अकादमीचे सचिव सुबोध आष्टीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत एकूण ६० शाळांनी सहभाग नोंदवला. नारायणा व स्कूल अॉफ स्कॉलर्स यांनी वेगवेगळ्या गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. ना.श्री.गडकरी म्हणाले, ‘लहान मुलांमध्ये असलेल्या कलाकौशल्याला व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. त्यांच्यातील कला-गुणांना वाव मिळाला तर आपला साहित्य-संस्कृतीचा वारसा जतन करणे शक्य होत असते. संगिताच्या माध्यमातून समाजात चांगला नागरिक घडविता येतो. समाजात गुणात्मक परिवर्तन करण्यासाठी संस्काराच्या माध्यमातून नवीन पिढी घडत असते.नागपूर महानगरपालिका, स्त्री शिक्षण मंडळ आणि बाल कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने कवीवर्य सुरेश भट सभागृहात लहान मुलांवर संस्कार करणारे चित्रपट दाखविण्यात यावे, अशी अपेक्षाही ना.श्री.गडकरी यांनी व्यक्त केली. विवेक घळसासी यांनी उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी प्रमोद गुजर, मंजिरी वैद्य-अय्यर व गुणवंत घटवाई या परीक्षकांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मधुरा रोडी-गडकरी यांनी, तर सूत्रसंचालन आसावरी देशपांडे यांनी केले.

No comments:

Post a Comment

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...