नागपूर:- कुष्ठरोग हा आजार सर्वांसाठीच मोठे आव्हान आहे.
कुष्ठरुग्णांसाठी शासनाच्या विविध योजना सुरु आहेत. अशात कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन
त्यांना उपाचाराखाली आणणे व शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आरोग्य
विभागाचे उद्दिष्ट आहे. कुष्ठरोग निर्मूलनासाठी मनपा, अधीक्षक नागरी
कुष्ठरोग पथक (SULU), शासकिय व खासगी
डॉक्टर्स या सर्वांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य
अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले. मनपा
मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये सोमवारी (ता.२४)
वैद्यकीय अधिकारी व खासगी डॉक्टर्स करिता राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यशाळा
आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. सेलोकर बोलत होते. कार्यशाळेत सहायक संचालक कुष्ठरोग डॉ. विजय डोईफोडे, मनपा अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र
बहिरवार, लता मंगेशकर हॉस्पिटलचे कुष्ठरोग
विभाग प्रमुख डॉ. सुशील पांडे, अधीक्षक नागरी कुष्ठरोग पथक -३ चे वैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्दीक
अहमद शेख, डॉ. संजय पुलकवार, डॉ. शाजीया
शम्स, डॉ.
दिपिका साकोरे, डॉ. महेंद्र चांदुरकर, मनपाचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील
कांबळे, डॉ. दीपांकर भिवगडे, पीएचयू अर्चना
खाडे यांच्यासह मोठ्या संख्येत आरोग्य
अधिकारी, खासगी डॉक्टर्स आदी उपस्थित होते. पूर्व विदर्भात कुष्ठरोगाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. नागपूर शहरातही
कुष्ठरुग्णांची संख्या ही दखलपात्र आहे. कुष्ठरोग या आजाराच्या निर्मूलनासाठी
रुग्णांना उपचाराच्या कक्षेत आणणे अत्यंत आवश्यक आहे. या आजाराची इतर
आजारांप्रमाणे तीव्र लक्षणे नसल्यामुळे रुग्णालाही आपल्याला कुष्ठरोग आहे हे कळत
नाही. अशात अशा रुग्णांचा शोध घेणे आव्हानात्मक ठरते. या स्थितीत वैद्यकीय
क्षेत्रात कार्यरत व्यक्तींमध्ये जनजागृतीची आवश्यकता आहे. कुष्ठरोग व त्याचे
प्रकार ओळखणे आवश्यक आहे. मनपाच्या आशा सेविका घरोघरी जातात. त्यांच्या माध्यमातून
कुष्ठरुग्णांचा शोध घेता येऊ शकतो.
याशिवाय प्रत्येक पांढरा किंवा लाल चट्टा हा कुष्ठरोग असू शकत नाही, त्यामुळे चाचणी आणि निदान यादृष्टीने लक्ष देणे
आवश्यक आहे. अनेक रुग्ण त्वचेवरील चट्टा, डाग
यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये जातात. अशात त्यांची नोंद घेऊन त्यांची माहिती
मनपाला देणे आवश्यक आहे. कुष्ठरोगाचा समूळ नायनाट करण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने
समन्वयाने काम करण्याचे आवाहन मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर
यांनी केले. कार्यशाळेमध्ये सहायक संचालक
कुष्ठरोग
डॉ. विजय डोईफोडे यांनी कुष्ठरोगाची होणारी लागण, त्याची जगभरातील स्थिती आणि भारतातील संख्या या
सर्वांचा उहापोह केला. भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक कुष्ठरुग्ण असून त्यातीत
सर्वात जास्त गडचिरोली जिल्ह्यात आढळतात. पाठोपाठ चंद्रपूर, गोंदिया, भंडारा
आणि नागपूरचा क्रमांक आहे. कुष्ठरोग जीवघेणा आजार नाही पण तो निष्काळजीपणामुळे
वाढतो. वेळीच उपचाराने कुष्ठरोग बरा होतो. त्यामुळे रुग्णांचा शोध घेणे हे सर्वात
महत्वाचे आहे, असे सांगत त्यांनी येत्या काळात
सर्वांनी समन्वयातून सर्वाधिक रुग्ण शोधण्याचे आवाहन यावेळी केले. लता मंगेशकर
हॉस्पिटलचे कुष्ठरोग विभाग प्रमुख डॉ. सुशील पांडे यांनी कुष्ठरोगाबाबत सविस्तर
माहिती दिली. कुष्ठरोग हा रुग्णाच्या जीवनशैलीवर प्रभाव करतो. त्यामुळे रुग्णाला
समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असते. त्यासाठी रुग्णाचे योग्य निदान आवश्यक
आहे. डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला शरीरावरील डाग, चट्टे याविषयी विचारणा करुन त्याची नोंद ठेवल्यास
पुढील उपचारासाठी मदत होउ शकते, असेही
ते म्हणाले. कार्यशाळेत डॉ.दिपिका साकोरे यांनी देखील माहिती दिली.कार्यशाळेच्या
सुरुवातीला महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला डॉ. दीपक सेलोकर यांच्यासह मान्यवरांनी
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यशाळेचे संचालन पीएचयू अर्चना खाडे यांनी
केले व डॉ. शाजीया शम्स यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment