नागपूर:- केंद्र सरकार, राज्य सरकार आणि
नागपूर महानरगपालिकेद्वारे दिव्यांगांकरिता अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात
येतात. मात्र दिव्यांगांची एकत्रिट डाटा उपलब्ध नसल्यामुळे प्रत्येक दिव्यांग
व्यक्तीपर्यंत योजना पोहोचविण्यात अडचण निर्माण होते. शहरातील कुणीही दिव्यांग
शासकीय योजनांपासून वंचित राहू नये याकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे लवकरच
शहरातील दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मनपाच्या आशा सेविका हे
सर्वेक्षण करणार असून यासंदर्भात त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट
सभागृहामध्ये बुधवारी (ता.१२) हे प्रशिक्षण कार्य पार पडले. या प्रशिक्षणाच्या
उद्घाटन प्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी प्रामुख्याने उपस्थित
होते. मंचावर अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, समाज विकास विभागाच्या
उपायुक्त
डॉ. रंजना लाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय
आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, महात्मा गांधी सेवा संघाचे प्रकल्प संचालक श्री. विजय
कान्हेकर, नीलेश छडवेलकर आदींची उपस्थिती होती. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य
आणि समाज विकास विभागाद्वारे बुधवारी (ता.१२) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट
सभागृहामध्ये महात्मा गांधी सेवा संघ यांच्या माध्यमातून दिव्यांग सर्वेक्षणाबाबत
आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त बोलत होते.यावेळी
बोलताना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिव्यांगांच्या
सर्वेक्षणामुळे पुढील काळात दिव्यांगांच्या
उत्थानासाठी कृती आराखडा निश्चित होईल
व यात आशा स्वयंसेविकांचे योगदान महत्वाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. केंद्र, राज्य आणि मनपाच्या
सर्व योजनांचा प्रत्येक दिव्यांगाला लाभ पोहोचून त्याच्या जीवनात सुलभता निर्माण
करणे हा मनपाचा मानस आहे. मात्र अनेक दिव्यांग माहितीअभावी व कागदपत्रांच्या अभावी
योजनांपासून वंचित राहतात. या सर्व कल्याणकारी योजनांचा दिव्यांगांना लाभ
पोहोचविण्यासाठी सर्वेक्षण महत्वाचे पाऊल ठरणार आहे. दिव्यांगांचे सर्वेक्षण
करताना दिव्यांगत्वाचे प्रकार, त्यांचे यूडीआयडी कार्ड, आधार कार्ड तसेच इतर माहिती देखील घेतली जाणार आहे.
ज्यामुळे पुढील काळात त्याची पूर्तता करुन त्यांना योजनांपासून लाभान्वित करण्यात
येईल. यासाठी सर्वेक्षण करण्यात येत असून यात आशा सेविकांची भूमिका महत्वाची आहे.
आरोग्य विभागाशी संबंधित विविध कार्य करताना आशा स्वयंसेविकांचा थेट संपर्क
नागरिकांशी येतो. नेहमी त्यांच्या संपर्कात येत असल्यामुळे नागरिकांकडून योग्य
माहिती मिळविण्यात आशा सेविकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. योग्य आणि बिनचूक
माहितीमुळे पुढील काळात मोठा ‘डाटाबेस’ मनपाकडे तयार होईल, असाही विश्वास डॉ.
अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी नागरिकांना सुध्दा या
सर्वेक्षणाच्या कामात सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक करताना अतिरिक्त
आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी सर्वेक्षणाची संकल्पना विषद केली. जागतिक बँकेच्या
अहवालानुसार कोणत्याही देशात त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ५ ते ८ टक्के एवढे
दिव्यांगांचे प्रमाण असते. कुटूंबातील एक व्यक्ती दिव्यांग असल्यास संपूर्ण
कुटूंबाची दिनचर्या त्या व्यक्तीच्या अनुरूप सुरु असते. अशा स्थितीत दिव्यांगांना
आधार देण्यासाठी अनेक योजना कार्यरत आहेत.
या योजनांचा त्यांना लाभ मिळवून
देण्यासाठी आधी दिव्यांगांची ओळख निश्चित करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वेक्षण
महत्वाचे ठरणार आहे. एप्रिल ते जून या कालावधीमध्ये हे सर्वेक्षण करण्यात येणार
आहे. शहरातील दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे जीवन सुकर करण्याच्या
दृष्टीने नागपूर महानगरपालिकेने दिव्यांगांच्या सर्वेक्षणाचे महत्वाचे पाऊल उचलले
आहे, असेही त्या म्हणाल्या.वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक
सेलोकर यांनी प्रशिक्षणादरम्यान आशा सेविकांद्वारे उपस्थित करण्यात आलेल्या
शंकांचे निराकरण केले. प्रशासकीय पातळीवरील महत्वाच्या प्रश्नांचे देखील त्यांनी
उत्तरे दिली. आशा स्वयंसेविकांनी अनेक सर्वेक्षण यशस्वीपणे पार पाडून शहराच्या
आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका निभावली आहे. डेंग्यू, चिकुन गुनिया
आदींच्या सर्वेक्षणामुळे रुग्णसंख्येत यावर्षी मोठी घट झाली.
गरोदर माता, बालकांचे आरोग्य व
लसीकरण याबाबत नियमित सुरु असलेल्या सर्वेक्षणाची देखील त्यांनी दखल घेऊन कौतुक
केले. मोबाईल ॲपवरुन ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरुपात हे सर्वेक्षण केले जाणार
आहे. यामध्ये वैद्यकीय आरोग्य विभाग
, समाज विकास विभाग, महात्मा गांधी सेवा संघ यांच्यासह सर्व झोनल वैद्यकीय
आरोग्य अधिकारी यांचे सहकार्य असणार आहे, असेही डॉ. सेलोकर यांनी सांगितले.प्रशिक्षणामध्ये महात्मा
गांधी सेवा संघाचे प्रकल्प संचालक श्री. विजय कान्हेकर यांनी संपूर्ण सर्वेक्षणाची
पार्श्वभूमी विषद केली. नीलेश छडवेलकर यांनी सर्वेक्षणासाठी वापरले जाणारे ॲप, त्याची कार्यशैली
आणि प्रश्नावली याचे विस्तृत विवेचन केले. संजय पुसाम यांनी दिव्यांगत्वाची ओळख
आणि प्रकार या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमात माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.
सरला लाड, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, झोनल वैद्यकीय
आरोग्य अधिकारी डॉ. विजय तिवारी, डॉ. अतिक खान, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. दीपंकर भिवगडे, डॉ. सुनील कांबळे, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अश्विनी निकम, आरोग्य व राष्ट्रीय
नागरी आरोग्य अभियान समन्वयक दीपाली नागरे, आशा योजना सुपरवायजर रेखा निखाडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन सिल्विया मोरडे यांनी केले व आभार
वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment