Monday, March 17, 2025

विदर्भातील शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढविण्याची सुवर्णसंधी,केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

नागपूर:- कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे या एकेका जिल्ह्यांत ७० ते ८० लाख लिटर्स दूध उत्पादन होते. विदर्भातील भंडारा व गोंदिया हे दोन जिल्हा सोडले तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये दूधाचे उत्पादन फार कमी होते. पण आता मदर डेअरी प्रकल्पाच्या निमित्ताने विदर्भातील शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढविण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (रविवार, दि. १६ मार्च) केले.मराठवऱ्हाड दुग्ध उत्पादक संघटनेचा शुभारंभ तसेच धारा खाद्य तेल पॅकिंग केंद्राचे भूमिपूजन तसेच मदर डेअरीच्या बुटीबोरी स्थित मेगा मॅन्युफॅक्चरिंग प्लान्टच्या 
कामाचा शुभारंभ ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. तेलंगखेडी मार्गावरील मदर डेअरी प्लान्ट येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी  एनडीडीबीचे अध्यक्ष डॉ. मीनेश शहा, मदर डेअरी फ्रूट्स अँड व्हेजिटेबलचे मनीष बंदलिश, नॅशनल डेअरी सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सी.पी. देवानंद, मराठवऱ्हाड दूग्ध उत्पादक कंपनीच्या चेअरमन वर्षा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. ना.श्री. गडकरी म्हणाले,




 ‘मराठवाडा आणि विदर्भासाठी सुवर्णाक्षराने लिहिला जावा असा आजचा दिवस आहे. २०१६ पासून मदर डेअरीसोबत मिळून राज्य सरकार धवल क्रांती आणण्याचे आणि दूध उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न करीत आहे. कारण विदर्भातील मुख्य पिकांची अवस्था वाईट आहे. वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यांना शेतकरी आत्महत्यांनी ग्रासले. दुसरीकडे गडचिरोलीला नक्षल चळवळीने ग्रासल्यामुळे तेथील विकासाला खीळ बसली होती. मात्र, मदर डेअरीसोबत राज्य सरकारने सामंजस्य करार केला आणि योजना तयार केली. त्यानंतर मदर डेअरीने सुरू केलेले काम दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.मराठवऱ्हाड दूग्ध उत्पादक संघटनेमुळे विदर्भातील महिला शेतकरी देखील आत्मनिर्भर होतील, असा विश्वास ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केला. त्याचवेळी त्यांनी विदर्भातील दूध उत्पादन वाढण्याची गरज असल्याचे म्हटले. विदर्भात हरियाणा, पंजाब, गुजरात, राजस्थानातून गायी आणल्या जात आहेत. अशाने स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. मदर डेअरीशी जुळलेल्या ३५ हजार शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे. यांच्यापैकी प्रत्येकाने पाच चांगल्या गायी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केल्या तर दूध उत्पादन वाढेल. स्थानिक लोकांनी जास्त दूध देणाऱ्या गायी तयार केल्या तर त्याचा विदर्भातील शेतकऱ्यांनाच फायदा होईल,’ असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. मदर डेअरीने आता पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने येथील स्थानिक गो-पालकांच्या गायींच्या चांगल्या वाणांसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मदर डेअरी मार्फत पशुवैद्यकीय तज्ज्ञ एम्ब्रिओ ट्रान्सफर तसेच इन विट्रो फर्टीलायझेशन (आयव्हीएफ) सारखे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत तसेच दुग्ध उत्पादकांपर्यंत पोहोचतील अशा रीतीने प्रयत्न करावे. यामधून जवळपास प्रतिदिन 12 ते 15 लिटर दूध देणाऱ्या गाई तयार केल्या तर महाराष्ट्राला परराज्यातील गायी येथे आणण्याची गरजपडणार नाही,’ असे ना. श्री. गडकरी यांनी यावेळी नमूद केले.शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे पशुखाद्य मिळावे यासाठी मदर डेअरीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन ना. श्री. गडकरी यांनी केले. विदर्भात कापसाची सरकी, तुर चुरी, तसेच मका मुबलक प्रमाणात आहे. यातून जिल्हानिहाय पशुधन विकसित करून ते किफायतशीर किमतीमध्ये दूध उत्पादकांना उपलब्ध करून देण्याची सूचना ना. श्री. गडकरी यांनी मदर डेअरीला केली. नेपियर ग्रासच्या माध्यमातून वर्षभर हिरवा चारा या पशुधनाला उपलब्ध करून दिल्यास दूध उत्पादनात सुद्धा वाढ होईल, असेही ते म्हणाले. मदर डेअरीच्या मार्फत नागपूर येथील सुप्रसिद्ध अशा संत्रा बर्फीचे देखील मार्केटिंग होणे आवश्यक आहे. ही बर्फी शुद्ध संत्र्याचा पल्पपासूनच तयार केली जाईल. त्यामुळे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना देखील फायदा होईल, असा विश्वास ना. श्री. गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.ना.श्री.गडकरी यांनी गडचिरोली आणि वाशिम या आकांक्षी जिल्ह्यांमध्ये देखील विशेष लक्ष देण्याचे आवाहन मदर डेअरीला केले.

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...