नागपूर:- महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या
वतीने दिल्या जाणारा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार मुख्यमंत्री मा.
श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ.
अभिजीत चौधरी यांना मुंबईत नागरी
सेवा दिनाच्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी कौशल्य विकास मंत्री मा. श्री मंगल
प्रभात लोढा व राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक उपस्थित होते.महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान
विभागाने विकसित केलेल्या आर्थिक
नियोजन प्रणाली अर्थात फायनान्सियल अकाऊंटिंग सिस्टम (एफएएस)या
प्रणालीसाठी हा १० लाख रुपयांचा पुरस्कार सन २०२३-२४ या वर्षासाठी प्रदान करण्यात आला आहे. राजीव गांधी
प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा २०२३-२४ अंतर्गत राज्यस्तरावर थेट प्राप्त
प्रस्ताव आणि
विभागीय समित्यांकडून प्राप्त प्रस्तावांमधून राज्यस्तरिय निवड
समितीने नागपूर महापालिकेने राबविलेल्या या प्रणालीची या पुरस्कारासाठी निवड केली. या पुरस्कारांची घोषणा राज्य सरकारच्या
सामान्य प्रशासन विभागाने काही दिवसांपूर्वी केली
होती. या पुरस्कारने नागपूर
महापालिकेने राबवलेल्या या अभिनव प्रणालीचा राज्यपातळीवर गौरव झाला आहे.यापूर्वी सुद्धा नागपूर महापालिकेला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता
पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. जिओ-सिव्हीक मालमत्ता कर व्यवस्थापन
प्रणालीसाठी गेल्यावर्षी नागपूर महापालिकेला सन्मानित करण्यात आले होते. नागपूर
महापालिकेला सलग दुसऱ्यांदा प्रशासकीय गतिमानता पुरस्कार मिळाल्याने नागपूर
महापालिकेच्या प्रशासनाच्या कामकाजावर यशस्वीतेची मोहर उमटली आहे.
No comments:
Post a Comment